वसई | प्रतिनिधी
वसई पूर्वेतील सातिवली परिसरात मानव रेसिडेन्सी समोर असलेल्या सर्वे नंबर ५० वरील अनधिकृत बांधकामावर अखेर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. ही कारवाई साधी प्रशासनिक प्रक्रिया नसून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या नेत्यांच्या ठाम आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे घडून आली आहे.

या कारवाईसाठी विशेषतः पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा सरचिटणीस रोहित ससाणे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक खर्डे आणि सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष धर्मराज व्हटकर यांनी सातत्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या आदेशावरून ही कारवाई अंमलात आणण्यात आली.

स्थानिक रहिवाशांनी अनधिकृत बांधकामांविरोधात अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा मुद्दा राजकीयदृष्ट्या लावून धरल्यामुळे अखेर प्रशासनाला पावले उचलावी लागली.

पक्षाचे नेते रोहित ससाणे यांनी म्हटले की, “विकासाच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकामांना आंधळा पाठिंबा देणे आम्ही सहन करणार नाही. कायदा आणि शिस्त टिकवण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती.”

या कारवाईनंतर सातिवली परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, स्थानिक विकास व न्यायासाठी लढणाऱ्या पक्षाच्या भूमिका अधिक बळकट झाल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *