विरार | प्रतिनिधी

विरार पश्चिम रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक २ वर गुटख्याच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यामुळे त्यांना गुन्हेगारी पद्धतीने धमकावण्यात आले. पोलिस यंत्रणांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२७ जून २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता जनमत निर्माण साप्ताहिकाचे उपसंपादक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष धर्मराज व्हटकर आणि पत्रकार व कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघेला हे विरार स्थानकावर असताना, काही तरुण मोठ्या गोण्यांसह संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. चौकशी केली असता “कपडे आहेत” असे उत्तर मिळाले. मात्र ना चलान, ना बिल असल्याने यावर शंका गडद झाली.

या दरम्यान संशयितांनी खुलेआम RPF, GRP आमच्याच हातात आहेत, असे सांगून धमकी दिली. “तुम्ही काहीही करा, येथे सर्व मॅनेज आहे,” असे म्होरक्याने उद्धटपणे सांगितले. ही बोलकी कबुली म्हणजेच भ्रष्ट यंत्रणेचा खालचा स्तर दाखवणारी खळबळजनक बाब ठरली.

व्हटकर आणि वाघेला यांनी तत्काळ बोलींज पोलिस स्टेशन व 112 हेल्पलाईनवर संपर्क केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी स्टेशन मास्टर राजेश म्हात्रे यांच्या हस्तक्षेपाने व वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर काहीशी हालचाल झाली.

स्थानिक पोलीस पोहचले, परंतु रेल्वे हद्दीत प्रकरण असल्याने त्यांनी माघार घेतली. अखेर RPF कॉन्स्टेबल आले आणि संबंधित चार जणांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी GRP कडे सोपवले.

GRP कार्यालयातच धमक्या!

वसई रोड GRP कार्यालयात चौकशीसाठी नेताच, संशयितांच्या अन्य साथिदारांनी कार्यालयात गर्दी करत पत्रकारांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. “तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो,” अशी धमकी दिली गेली. पत्रकारांना भडकावण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर खोटे गुन्हे लावण्यासाठी योजनाबद्ध कटकारस्थान आखले जात असल्याचे उघड झाले.

प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष विनायक खर्डे आणि शहर अध्यक्ष प्रमोद पारकर यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले. प्रभारी अधिकारी भगवान धांडे यांनी तात्काळ लक्ष घालत गुन्हा नोंदवला.

कायदेशीर कारवाई

रात्री ११.३० वाजेपर्यंत चौकशी करून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 223, 275, 351(2), 30(2)(a) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कलम 58 व 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुटखा माफियांचे बळकट जाळे

गुजरात ते विरार दरम्यान गुटख्याची खुलेआम तस्करी होतेय. मजुरांच्या हाताने गोण्या वाहून घेतल्या जातात, तर सूत्रधार ऐशोआरामी जीवन जगतो. यामागे रेल्वे पोलिसांचं मूक समर्थन असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशा माफियांना जरब बसण्यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिक आणि पत्रकारांकडून होत आहे.

पत्रकारांवर हल्ले – कायद्याचा अमल नाही?

महाराष्ट्रात २०१९ मध्ये पत्रकार सुरक्षा कायदा (अ.क्र. २९) लागू करण्यात आला असून, पत्रकारांच्या कामाच्या ठिकाणी संरक्षणाची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात पोलीस प्रशासनाची अंमलबजावणी दिसून येत नाही, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी

या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने गुटखा माफियांवर कठोर कारवाई, RPF-GRP मधील दोषींवर निलंबन, आणि पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *