वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’ अंतर्गत येणाऱ्या पेल्हार विभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. सोपारा फाटा, अवधूत आश्रम, मायकल कंपाऊंड, जाबर पाडा, रिचर्ड कंपाऊंड, नवजीवन गधापाडा या भागात नव्या बांधकामांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, स्थानिक नागरिकांनी याबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत.

स्थानिकांचा आरोप आहे की काही भूमाफिया अधिकाऱ्यांशी साठगाठ करून अनधिकृत बांधकामे उभी करत असून, पेल्हार विभागातील हरित पट्ट्यालाही मोठा धोका निर्माण होत आहे. झाडांची तोड करून जागा मोकळी करण्यात येत असल्याने पर्यावरणीय समतोलही बिघडतो आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, शासन व महापालिकेच्या नियमांनुसार अनधिकृत बांधकाम तातडीने पाडले जाणे आवश्यक असते. राज्य सरकारकडूनही वारंवार अशा बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रात मात्र अनधिकृत बांधकामांवर कारवाई थंडावली असल्याचा आरोप केला जात आहे.

अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह

सी यू सी विभागाचे अति. आयुक्त दीपक सावंत व सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्या विभागात मोठ्या प्रमाणात ही बांधकामे सुरू असल्याने त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तक्रारी असूनही कारवाई शून्य असल्याने प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी चर्चा जनमानसात रंगू लागली आहे.

नागरिकांची मागणी

नागरिक व स्थानिक संघटनांनी आयुक्त मनोज सूर्यवंशी यांना लेखी निवेदन देऊन पेल्हार विभागातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने तोडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, यात सहभागी असलेल्या भूमाफिया आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई व्हावी अशीही भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *