
वसई–विरार : वसई–विरार शहरातील नागरिकांनी घनकचरा विभागासह विविध प्रशासनिक विषयांवर मराठी भाषेत ईमेलद्वारे पाठवलेल्या अभ्यावेदनांची राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दखल घेतली आहे. वारस नियुक्ती, घनकचरा विभागातील कामकाज, कंत्राटी नियुक्त्या, पारदर्शकता आणि इतर प्रशासनिक प्रक्रियांवरील तक्रारींचा आढावा घेत आयोगाने संबंधित विभागांना अभ्यावेदनांची प्रत पाठवून आवश्यक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
आयोगाने मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य ती कार्यवाही करून तथ्यात्मक अहवाल तातडीने आयोगाकडे सादर करावा, असे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी मांडलेले मुद्दे लोकहिताचे असल्याचे नमूद करत, प्रशासनातील नियमबद्धता आणि पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचेही आयोगाने निर्देशांत म्हटले आहे.
सदर पत्र सचिव, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग यांच्या अनुमोदनाने जारी करण्यात आले असून, या प्रकरणातील पुढील अहवालांची प्रतीक्षा प्रशासनाकडून ठेवली जात आहे.
