वसई-विरार:(प्रतिनिधी)- एकीकडे पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेत (VVMC) प्रत्यक्षात मात्र ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीनंतर बदल्या होणे अपेक्षित असताना, आरोग्य विभागातील काही ‘लाडके’ आरोग्य निरीक्षक गेल्या १५ वर्षांपासून (२००९ पासून) एकाच खुर्चीला चिटकून बसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
प्रशासनाला चपराक: या प्रकरणावर बोलताना युवाशक्ति मीडियाच्या संस्थापक अध्यक्षा रुबीना मुल्ला यांनी प्रशासनाला थेट धारेवर धरले आहे. त्यांनी विचारले आहे की, “जर इतर आरोग्य निरीक्षकांचे बदलीचे ठराव होतात, तर फक्त ठराविक दोनच अधिकाऱ्यांवर प्रशासन इतके मेहरबान का?” बदलीच्या नियमांना केराची टोपली दाखवून या अधिकाऱ्यांना अभय देण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध दडले आहेत, असा बोचरा सवाल आता उपस्थित होत आहे.
व्हीआयपी ट्रीटमेंटचा आरोप: आरोग्य निरीक्षकाचे काम हे ‘फिल्ड’वर जाऊन जमिनीवरचे प्रश्न सोडवणे असते. मात्र, ठेका पद्धतीवरील ४३ आरोग्य निरीक्षकांपैकी काही महिला अधिकाऱ्यांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ देत थेट मुख्यालयात बसवून प्रशासन नेमका कोणता आदर्श घालून देत आहे? हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता सुनील शाह यांनी उपस्थित केला आहे.
नवे आयुक्तांकडून अपेक्षा: मागील आयुक्तांच्या काळात अनेक तक्रारी करूनही त्या फायली धूळ खात पडून होत्या. आता नवीन आलेल्या आय.ए.एस. (IAS) दर्जाच्या आयुक्तांकडून सामान्य जनतेला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मोठी अपेक्षा आहे. नवीन आयुक्तांनी या ‘प्रस्थापित’ झालेल्या व्यवस्थेला चपराक लावून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ दूर नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *