
वसई: रुग्णांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या डी. एम. पेटीट रुग्णालय औषध घोटाळ्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेने ‘कारवाई’च्या नावाखाली चक्क ‘बदल्यांचा’ खेळ मांडला आहे. महिना उलटूनही गंभीर कारवाई करण्याऐवजी, संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या करून प्रशासन नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी कोणत्या ‘अदृश्य शक्ती’ कार्यरत आहेत, अशी शंका आता बळावली आहे.
बदली हा ‘शिक्षा’ की ‘पळवाट’?
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार, या प्रकरणाशी संबंधित विभागातील कंत्राटी फार्मासिस्ट कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुदत संपलेली औषधे रुग्णांना देण्यासारखा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा समोर असताना, कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याऐवजी केवळ ‘बदली’ करणे म्हणजे प्रशासनाने स्वतःच्याच चौकशी समितीचा अपमान करण्यासारखे आहे. ही बदली म्हणजे दोषींना दिलेली शिक्षा नसून, जनतेचा रोष शांत करण्यासाठी केलेली निव्वळ ‘डोळ्यात धूळफेक’ असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव कधी?
ज्या वैद्यकीय विभागाच्या देखरेखीखाली हा सावळागोंधळ सुरू आहे, त्याच विभागाच्या अंतर्गत बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. “चोराला शिक्षा देण्याऐवजी त्याला केवळ दुसऱ्या खोलीत हलवणे” याला न्याय म्हणायचे का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. या संपूर्ण प्रकरणात प्रशासकीय स्तरावर मोठी आर्थिक उलाढाल किंवा वरदहस्त असल्याशिवाय इतकी ढिलाई दाखवली जाणे अशक्य असल्याचा आरोप आता पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
पत्रकार बांधवांचे एकजूट होण्याचे आवाहन
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या माफियांच्या विरोधात आता सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. जर आज या ‘अदृश्य शक्तीं’नी हा घोटाळा दाबण्यात यश मिळवले, तर भविष्यात सरकारी रुग्णालये ही ‘कत्तलखाने’ बनायला वेळ लागणार नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या प्रकरणाचा पाठपुरावा करणे आता अनिवार्य झाले आहे.
१ मे रोजी ‘न्याय’ मिळणार का?
नगरसेवक अशोक शेळके यांनी १ मे पासून दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची झोप उडाली असली, तरी या ‘बदली’ नाट्याने आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जोपर्यंत दोषींना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
