
पालघर, दि. ४ (विशेष प्रतिनिधी): जुलै महिन्यातील अभूतपूर्व अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हवालदिल झालेल्या पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्वसमावेशक प्रस्तावाला मंजुरी देत शासनाने विद्यमान निकषांमधील मदतीत वाढ करत ₹८१.२२ कोटींचे विशेष व वाढीव नुकसानभरपाई पॅकेज जाहीर केले आहे.
पूर्वीच्या निकषांनुसार या भागासाठी केवळ ₹१२.८० कोटींची मदत देय होती. मात्र, आपत्तीची व्याप्ती आणि नागरिकांच्या नुकसानीची दाहकता पाहता शासनाने मदतीत सुमारे ५३४ टक्क्यांची विक्रमी वाढ केली असून, यामुळे ₹६८.४० कोटींची अतिरिक्त मदत उपलब्ध झाली आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (BDS) हे अनुदान वितरीत करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.यंदाच्या सुधारित पॅकेजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक मदतीच्या कक्षेत न येणाऱ्या लहान व्यवसायांचा आणि उपजीविकेच्या साधनांचा पहिल्यांदाच विशेष समावेश करण्यात आला आहे.
- दुकाने व व्यावसायिक आस्थापना: पूरग्रस्त दुकानदारांसाठी प्रति आस्थापना ₹५०,००० स्वतंत्र नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. या अंतर्गत पहिल्या अतिवृष्टीतील ६,०६५ दुकानदारांना ₹३०.३२ कोटी आणि दुसऱ्या अतिवृष्टीतील २७७ दुकानदारांना ₹१.३८ कोटी वितरीत केले जातील.
- रस्त्यावरील विक्रेते (फेरीवाले): रोजंदारीवर आणि लहान व्यवसायांवर अवलंबून असलेल्या फेरीवाल्यांना दिलासा देण्यासाठी प्रति विक्रेता ₹१०,००० ची मदत जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १,००० विक्रेत्यांसाठी ₹१ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
- पोल्ट्री शेड व इतर साधने: बाधित पोल्ट्री शेडसाठी प्रति शेड ₹५,००० नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. तसेच, मासेमारी करणाऱ्यांसाठी बोटी व उपजीविकेच्या इतर साधनांचाही पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- सुधारित पॅकेजमुळे इतर श्रेणीतील मदतीमध्येही भरघोस वाढ झाली आहे:
- कपडे व घरगुती भांडी: जीवनावश्यक वस्तूंसाठी मिळणारी मदत प्रति कुटुंब ₹५,००० वरून थेट ₹१५,००० करण्यात आली आहे. यामुळे १५,८०२ (पहिली अतिवृष्टी) आणि ७,५०३ (दुसरी अतिवृष्टी) कुटुंबांना मोठा फायदा होईल.
- पूर्णतः व अंशतः नुकसान झालेली घरे: पूर्णतः नुकसान झालेल्या घरांसाठीची मदत ₹१.२० लाखांवरून ₹१.५० लाख करण्यात आली आहे. तर अंशतः नुकसान झालेल्या घरांना नुकसानीच्या प्रमाणानुसार ₹६,५०० ते ₹५०,००० पर्यंतचे सहाय्य मिळणार आहे.
- इतर बाबी: कोसळलेल्या झोपड्यांसाठी मदत ₹१५,००० करण्यात आली असून, मृत दुभत्या जनावरांसाठी प्रति जनावर मदत ₹४०,००० करण्यात आली आहे.
दि. १ ते ८ जुलै आणि दि. २२ ते २४ जुलै २०२६ या दोन वेगवेगळ्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रस्तावाला पालकमंत्री गणेश नाईक तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे भक्कम पाठबळ मिळाले.
या वाढीव मदतीमुळे केवळ घरे आणि कुटुंबांचे पुनर्वसनच होणार नाही, तर स्थानिक बाजारपेठा, लहान व्यावसायिक आणि पूरग्रस्त समुदायाला या भीषण संकटातून लवकरात लवकर सावरण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून आता ही सर्व मदत अत्यंत पारदर्शक आणि वेळेत पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
