Oplus_131072

मिरा-भाईंदर: पालिकेच्या तिजोरीऐवजी ठेकेदाराचे खिसे गरम; ११८ रुपयांऐवजी २३० रुपयांची लूट

मिरा-भाईंदर:प्रतिनिधी

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील मंगल नगर भाजी मार्केटमध्ये गरिबांच्या जिवावर ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा दुप्पट वसुली करून भाजी विक्रेत्यांची लूट केली जात आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय नियमांनुसार केवळ ११८ रुपये वसुलीचे आदेश असताना प्रत्यक्ष मात्र २३० रुपये उकळले जात आहेत. हा जास्तीचा ११२ रुपयांचा मलिदा कोणाच्या आशीर्वादाने ठेकेदाराच्या खिशात जात आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​महानगरपालिकेने मंगल नगर भाजी मार्केटसाठी काढलेल्या कार्यादेशात (वर्क ऑर्डर) स्पष्ट नमूद केले आहे की, प्रत्येक भाजी विक्रेत्याकडून १०० रुपये आणि १८ टक्के जीएसटी असे एकूण ११८ रुपये वसूल केले जावेत. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. या ठिकाणी प्रत्येक विक्रेत्याकडून दररोज २३० रुपये सक्तीने वसूल केले जात आहेत.

कायद्याचा विसर की डोळेझाक?

दिवसभर कष्ट करून पोट भरणाऱ्या गरीब विक्रेत्यांकडून दरमहा हजारो रुपये बेकायदेशीरपणे वसूल केले जात असताना पालिका प्रशासन यावर मौन बाळगून आहे. कार्यादेशातील अटींचा सरळसरळ भंग होत असतानाही ठेकेदारावर कारवाई का होत नाही? हा जास्तीचा पैसा पालिकेच्या महसुलात जमा न होता ठेकेदाराच्या फायद्यासाठी का सोडला जात आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आले आहेत.

“गरिबांच्या घामाचा पैसा ठेकेदाराच्या घशात घालण्याचे काम प्रशासन करत आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद असून प्रशासनाने तात्काळ हा कार्यादेश रद्द करावा आणि बेकायदेशीर वसुली थांबवावी. अन्यथा, या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.”

रवींद्र खरात (प्रवक्ता, युवक काँग्रेस, मिरा-भाईंदर)

वसुलीचे गणित:

  • अधिकृत दर: ₹१०० + १८% GST = ₹११८
  • प्रत्यक्ष वसुली: ₹२३०
  • ठेकेदाराचा अतिरिक्त नफा: ₹११२ (प्रति विक्रेता, प्रति दिन)

​महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणारा आणि गरिबांना नागवणारा हा वसुलीचा ‘बाजार’ तातडीने बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *