
युवाशक्ती कामगार संघटनेचा एल्गार; मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार..
पालघर:
पालघर जिल्ह्यातील महसूल विभागात वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची निवृत्तीच्या उंबरठ्यावर मोठी अडवणूक होत असल्याचे समोर आले आहे. सेवापुस्तकात (Service Book) आवश्यक असलेल्या मूलभूत नोंदी वेळेवर न झाल्याने कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल ‘ युवाशक्ती कामगार संघटने’ने घेतली असून, प्रशासकीय दिरंगाईविरोधात थेट मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
शासन परिपत्रकानुसार, कोणताही शासकीय कर्मचारी निवृत्त होण्यापूर्वी किमान सहा महिने आधी त्याच्या सेवापुस्तकातील सर्व नोंदी अद्ययावत असणे अनिवार्य आहे. मात्र, पालघरमध्ये चित्र याउलट आहे. गट विमा सभासद नोंद, मेडिक्लेम, हिंदी-मराठी भाषा परीक्षा, MS-CIT, आणि सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची नोंद अशा अनेक महत्त्वाच्या नोंदी वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. धक्कादायक म्हणजे, २०१८ पासूनची वेतनवाढ आणि वैद्यकीय रजेच्या नोंदींचाही पत्ता नसल्याने निवृत्तीवेतन (Pension) मिळण्यात तांत्रिक अडचणी येण्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
प्रशासकीय उदासीनतेचा फटका
स्थायित्व नोंद, वेतन निश्चिती आणि अपघात विमा यांसारख्या महत्त्वाच्या बाबींकडे संबंधित विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. निवृत्तीच्या काळात सन्मानाने निरोप घेण्याऐवजी, कर्मचाऱ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. ही परिस्थिती म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेचे अपयश असून कर्मचाऱ्यांचा छळ करणारा हा प्रकार कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
”ज्या कर्मचाऱ्यांनी शासनाचा कणा म्हणून काम केले, त्यांना निवृत्तीच्या वेळी अशा प्रकारे वेठीस धरणे चुकीचे आहे. प्रशासनाने जर तात्काळ सुधारणा केली नाही, तर आम्ही हे प्रकरण मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या दरबारात नेणार आहोत.”
— अध्यक्षा – ,युवाशक्ती कामगार संघटना
