
वसई, (प्रतिनिधी) : सह दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ६ कार्यालयाचा अनाकलनीय आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वसई तहसील कार्यालयाच्या आवारात आणि न्यायालयाजवळ असलेल्या या महत्त्वाच्या कार्यालयातील मागील अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर, या रिक्त पदाचा पदभार अन्य कोणाकडे आहे की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यातच आज, बुधवार (दि. ५ ऑगस्ट २०२६) रोजी कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत सूचना न देता अचानक कार्यालय बंद ठेवण्यात आल्याने, दूरदूरवरून कामासाठी आलेल्या नागरिकांची व वकिल वर्गाची प्रचंड गैरसोय झाली.
वसई परिसरातील नागरिक दस्त नोंदणी, मुद्रांक शुल्क भरणा तसेच विविध कायदेशीर कामांसाठी या कार्यालयात येतात. मात्र, आज सकाळी कार्यालयाला कुलूप असल्याचे निदर्शनास आल्याने तासनतास ताटकळत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली. शासनाच्या अखत्यारीतील महत्त्वाचे कार्यालय विनाकारण आणि विनापरवानगी बंद ठेवले जात असल्यामुळे नागरिकांच्या वेळेची आणि श्रमाची अक्षम्य नासाडी होत आहे.
कार्यालयात अधिकारी नसल्यामुळे आधीच रखडलेली कामे आणि त्यात आज अचानक कार्यालय बंद ठेवण्याच्या या प्रकारामुळे वसईतील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय यंत्रणेच्या या बेजबाबदार कारभाराला नेमके कोण जबाबदार? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची नोंद घेत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून या रिक्त जागेवर सक्षम अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी आणि नागरिकांची होत असलेली हेळसांड थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
