​तक्रारदार संजीव पांडे यांच्या तक्रारीनंतर पालिकेचा अंतिम निर्णय


​नालासोपारा:
नालासोपारा (पश्चिम) येथील यशवंत गौरव परिसरातील ‘शितल ज्योत अपार्टमेंट’ मधील दुकानाच्या बाजूला करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम वसई विरार शहर महानगरपालिकेने (प्रभाग समिती ‘इ’) अखेर जमीनदोस्त केले आहे. पालिकेने दिलेल्या पूर्वसूचना आणि सुनावणीनंतरही सोसायट कडून कोणतेही वैध कागदपत्रे सादर न केल्याने ही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
​काय आहे संपूर्ण प्रकरण?
​या संदर्भात श्री. संजीव भागिरथी पांडे यांनी ४ मे २०२६ रोजी पालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेने १५ मे २०२६ रोजी संबंधित शितल ज्योत अपार्टमेंटचे चेअरमन आणि सेक्रेटी यांना नोटीस बजावली होती.
​यानंतर १९ जून २०२६ रोजी पालिकेच्या प्रभाग समिती (इ) कार्यालयात या प्रकरणाची अधिकृत सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीला इमारतीचे चेअरमन, सेक्रेटी तसेच दुकान क्र. २ व ३ चे भाडेकरू उपस्थित होते.
​पालिकेचा कायदेशीर निर्णय
​सुनावणीदरम्यान उपस्थित पक्षांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. मात्र, सोसायटचे चेअरमन व सेक्रेटी यांनी दुकानाच्या बाजूला केलेल्या बांधकामाबाबत कोणतीही अधिकृत परवानगी किंवा आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सहाय्यक आयुक्त मेधा वर्तक यांनी कायदेशीर आदेश जारी करत सदर बांधकाम पूर्णपणे ‘अनधिकृत’ घोषित केले होते व त्यानुसार पुढील नियमोचित कारवाई करण्याचे निश्चित केले होते.
​जेसीबीच्या साहाय्याने कारवाई
​याच कायदेशीर निर्णयाची अंमलबजावणी करत पालिकेच्या पथकाने कनिष्ठ अभियंता स्वप्निल संख्ये आणि लिपिक सूर्यभान पाटील यांच्या देखरेखीखाली शितल ज्योत अपार्टमेंटच्या आवारात धडक कारवाई केली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी (JCB) मशीनच्या साहाय्याने इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील अनधिकृतपणे बांधलेली भिंत आणि केबिनचे बांधकाम पूर्णपणे पाडले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पथक तैनात होते.
​महानगरपालिकेचे आवाहन: शहरातील कोणत्याही नागरिकाने किंवा सोसायटने अधिकृत परवानगीशिवाय कोणतेही अतिरिक्त बांधकाम करू नये. अनधिकृत बांधकामांवर पालिकेची अशीच कायदेशीर आणि कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *