वसई: प्रतिनिधी
येत्या पावसाळ्यात वसई-विरारकरांची तुंबलेल्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील मुख्य नाले आणि संभाव्य पूरग्रस्त सखल भागांचा पाहणी दौरा केला. ‘नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे,’ असा कडक इशारा देत आयुक्तांनी कामात दिरंगाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.

पावसाळ्यापूर्वी सज्जतेचा आढावा

शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सक्षम राहावी आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी आयुक्तांनी गुरुवारी (९ एप्रिल) विरार आणि नालासोपारा परिसरातील संवेदनशील भागांना भेटी दिल्या. या दौऱ्यात नाल्यांमधील गाळाची स्थिती, पाण्याचा निचरा होण्यातील अडथळे आणि सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.

महत्त्वाचे निर्देश:

  • सर्व नाले आणि गटारे पावसाळ्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ व मोकळी असावीत.
  • सखल भागांत पाणी साचल्यास उपशासाठी अतिरिक्त पंपिंग यंत्रणा तैनात ठेवावी.
  • आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास सक्रिय ठेवून आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवावे.
‘या’ भागांची केली पाहणी

आयुक्तांच्या या दौऱ्याची सुरुवात मुख्यालय परिसरातील नाल्यापासून झाली. यामध्ये प्रामुख्याने:

  • विरार (प.): रेल्वे कल्वर्ट क्र. ८३, म्हाडा इमारत परिसर, बोळींज-खारोडी रस्ता.
  • गोकुळ टाऊनशिप (विनय युनिक कल्वर्ट), रानपाडा, आगाशी पुरापाडा स्मशानभूमी.
  • जुने विवा कॉलेज व युनिटेक कॉम्प्लेक्समधील सखल भाग.
  • नारंगी, मारंबळ पाडा, आचोळे (द्वारका हॉटेल परिसर), मधुबन कॉम्प्लेक्स (गोखीवरे).
  • राजावली नाला आणि ओमनगर परिसर.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन

या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, शहर अभियंता आणि सर्व प्रभागांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देतानाच आयुक्तांनी नागरिकांनाही साद घातली आहे. “नाल्यांमध्ये कचरा टाकून पाण्याचा प्रवाह अडवू नका, शहर स्वच्छ ठेवा आणि प्रशासनाला सहकार्य करा,” असे आवाहन श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *