वसई-विरार महापालिकेत सुरक्षा रक्षक ‘बायोमॅट्रिक’च्या तावडीतून मुक्त?


आस्थापना विभागाच्या मेहेरबानीने काही जणांचा ‘पगार फुल, ड्युटी गुल’; संगणमताने भ्रष्टाचाराचा खेळ

वसई: (प्रतिनिधी) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात सध्या १५५ सुरक्षा रक्षक कार्यरत असताना, त्यातील काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने पालिकेच्या शिस्तीचे वाभाडे काढले आहेत. आस्थापना विभागातील अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ‘सेटिंग’मुळे या काही लाडक्या सुरक्षा रक्षकांना बायोमॅट्रिक हजेरीतून पळवाट काढून पूर्ण पगार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या प्रकरणात नवनिर्वाचित आयुक्त आणि महापौरांनी जातीने लक्ष देऊन या ‘महाभ्रष्टाचाराचा’ पर्दाफाश करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या १५५ रक्षकांपैकी ३ ते ४ रक्षक असे आहेत, जे नियमांना धाब्यावर बसवून कारभार करत आहेत. या कर्मचाऱ्यांची आस्थापना विभागात इतकी घट्ट ‘सेटिंग’ आहे की, त्यांच्या बायोमॅट्रिक हजेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केला जातो. कर्तव्यावर नसतानाही तांत्रिक घोळ घालून त्यांची उपस्थिती दर्शवली जाते आणि महिन्याच्या शेवटी त्यांचा पूर्ण पगार काढला जातो. हा सर्व प्रकार आस्थापना विभागातील जबाबदार अधिकारी आणि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संगणमताने सुरू असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे, या गैरप्रकाराची माहिती वरिष्ठ स्तरावर पोहोचू नये यासाठी आस्थापना विभागातील अधिकारी अत्यंत चतुराईने कागदोपत्री घोडे नाचवून वरिष्ठांची दिशाभूल करत आहेत. मात्र, पालिकेच्या वर्तुळात अशीही चर्चा आहे की, हे सर्व प्रकार काही बड्या वरिष्ठांच्या छुप्या आशीर्वादामुळेच सुरू आहेत. जर रक्षक कर्तव्यावर नसताना पगार उचलत असतील, तर पालिकेच्या तिजोरीवर हा थेट दरोडाच असल्याची भावना प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा प्रशासकीय कामांसाठी वापरला जातो, तर दुसरीकडे अशा प्रकारे ड्युटी न लावता पगार वाटण्याचे काम पालिकेत सुरू आहे. नवनिर्वाचित आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता या बायोमॅट्रिक घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई होणार का? की हा भ्रष्टाचार असाच ‘आशीर्वादाने’ बहरत राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *