Oplus_131072

अर्जांचा धूळखात पडून राहिलेला प्रस्ताव; दोन ठेका आरोग्य निरीक्षकांकडे ‘प्रभारी’ पदाची धुरा सोपविल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र संताप

वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील एक अजब कारभार समोर आला आहे. स्वच्छता व आरोग्य निरीक्षक पदाची आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांकडून अधिकृत परिपत्रक काढून अर्ज व कागदपत्रे मागवण्यात आली, मात्र प्रत्यक्ष नियुक्तीची वेळ आली तेव्हा स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून ठेका कर्मचाऱ्यांच्या गळ्यात प्रभारी पदाची माळ घालण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे पालिकेच्या पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.​वसई-विरार महापालिकेच्या आस्थापना विभागाने दि. ८ मे २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते. स्वच्छता/आरोग्य निरीक्षक पदासाठी आवश्यक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले होते.​नियमानुसार पात्र ठरणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत सर्व आवश्यक कागदपत्रे महानगरपालिका मुख्यालय आणि महापौर दालनात रीतसर सादर केली. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने या अर्जांवर कोणतीही कार्यवाही न करता ही फाईल धूळखात ठेवल्याचे सूत्रांकडून समजते.​दि. २२ जुलै २०२६ रोजी अचानक एक नवीन घडामोडीत प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक पदाच्या तात्पुरत्या जबाबदाऱ्या दोन ठेका आरोग्य निरीक्षकांना देण्यात आल्याची माहिती समोर आली. अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून स्थायी कर्मचाऱ्यांची माहिती मागवल्यानंतर, अचानक ही प्रक्रिया बाजूला सारून ठेका कर्मचाऱ्यांना पदभार सोपवल्याने कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“जर प्रभारी पदासाठी स्थायी कर्मचाऱ्यांकडून अधिकृत अर्ज व कागदपत्रे मागवण्यात आली होती, तर मग कोणत्या नियमांच्या आधारे त्यांना डावलून ठेका कर्मचाऱ्यांना हा पदभार देण्यात आला? आता स्थायी कर्मचाऱ्यांनी ठेका कर्मचाऱ्यांच्या आदेशांचे पालन करायचे का?”

असा संतप्त सवाल पालिका कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

४८ पैकी दोघांचीच ‘विशेष’ निवड का?

​या निर्णयामुळे प्रशासकीय नियमावली व पारदर्शकतेवर अनेक कायदेशीर व नैतिक प्रश्न उपस्थित होत आहेत:

  • निवडीचा निकष काय?: पालिकेत एकूण ४८ ठेका आरोग्य निरीक्षक कार्यरत असताना केवळ दोनच कर्मचाऱ्यांची निवड कोणत्या आधारावर करण्यात आली?
  • पात्रता व अनुभवाची उपेक्षा: या दोन कर्मचाऱ्यांकडे अशी कोणती अतिरिक्त शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव होता, जो इतर ४८ ठेका कर्मचाऱ्यांकडे किंवा वरिष्ठ स्थायी कर्मचाऱ्यांकडे नव्हता?
  • ज्येष्ठतेला हरताळ: गुणवत्ता आणि अनुभव हेच निकष असतील, तर त्यापेक्षा अधिक सेवा आणि आवश्यक अर्हता असलेल्या स्थायी कर्मचाऱ्यांना का डावलण्यात आले?
​​परिपत्रक एकासाठी काढायचे आणि प्रत्यक्ष पदभार दुसऱ्यालाच द्यायचा, हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून नियुक्ती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि नियमांवर उठवलेले मोठे प्रश्नचिन्ह आहे.

​या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी आणि प्रशासनाने यामागील कायदेशीर भूमिका व निकष स्पष्ट करत अधिकृत खुलासा करावा, अशी जोरदार मागणी आता महापालिका वर्तुळातून व कामगार संघटनांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed